वरणगावात वीज प्रश्न पेटला; स्वतंत्र उपकेंद्रासाठी अल्टिमेटम, अन्यथा धडक आंदोलन

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता भुसावळ :
वरणगाव शहरातील वाढत्या वीज समस्येमुळे परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटण्याच्या मार्गावर आहे. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वरणगाव विभागाला थेट अल्टिमेटम देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या बैठकीत उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे . नगरसेविका माला मेढे ,श्रद्धा गायकवाड नगरसेवक विनोद झोपे, निलेश खाचणे, शुभम जावळे, दिपेश पाटील, नाना चौधरी, राजेंद्र चौधरी , मिलिंद मेढे , इरफान सय्यद, अशपा क शाहा मुक्ताई नगरचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण, वरणगाव विभागाचे उपअभियंता सचिन पदबुद्ध, आशिष कुभारे अधिकारी उपस्थित होते .

शहरात गेल्या काही महिन्यांपासून अघोषित वीज कपात, वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि कमी-जास्त होणारा व्होल्टेज यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती उपकरणे खराब होण्याबरोबरच व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, वीजपुरवठ्याच्या या विस्कळीत व्यवस्थेमुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला असून नागरिकांना अनेक दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
सद्यस्थितीत वरणगावला पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार पडत असल्याने तांत्रिक बिघाड वाढले आहेत. त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारणे ही काळाची गरज असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ठामपणे मांडले आहे.
“अभियंता शिवाजी चव्हाण यांनी सांगितले की, वरणगाव शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची तसेच नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतली आहे. वीज समस्येचे निराकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी हमी त्यांनी दिली.”

निवेदनात त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये स्वतंत्र सब-स्टेशनचा प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, जुन्या वीजवाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर्सची दुरुस्ती, अघोषित वीज कपात तातडीने बंद करणे, फुलगाव येथील सब-स्टेशन सुरू करणे आणि शहरातील वीज तारा भूमिगत करणे यांचा समावेश आहे. तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरील डी.पी. सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि कठोरा येथील जंकवेलवर एक्सप्रेस फीडर बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वरणगावातील नागरिकांसह वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे. “नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून आता ठोस कृतीची वेळ आली आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

