भुसावळातील गजबजलेल्या काजीप्लॉट-पापनगरमध्ये रात्री भीषण आग; ४ ते ५ घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 2 शहरातील काजीप्लॉट येथील पापनगर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून चार ते पाच घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गजबजलेल्या वस्तीत अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे चार बंब व टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग विझविण्याचे काम काही काळ सुरू होते.
या वेळी स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत घरातील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन दलाला मदत केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत अग्निशमन अधिकारी प्रशांत भोळे यांच्या नेतृत्वाखालील रवींद्र पाटील दिनेश पुरोहित विजय मनोरे प्रवीण मिठे मयूर भोई अक्षय शिंदे नितेश रायपुरकर अनिल पवार कुणाल परदेशी पंकज डाके व इतर सहकारी कर्मचारी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

