वारंवार पाईपलाईन गळती; नागरिकांना पाणीटंचाईचा फटका, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 2
वरणगाव शहरातील उपकृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील नाल्याजवळ असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या सततच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजता नगरपरिषद प्रशासनाने पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सतत गळती होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली होती. अखेर प्रशासनाने आज प्रत्यक्ष दुरुस्ती हाती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाल्याजवळील या भागात पाईपलाईन जुनी झाल्यामुळे तसेच जमिनीच्या हालचालीमुळे वारंवार गळती निर्माण होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे तात्पुरती दुरुस्ती न करता या ठिकाणी नव्याने मजबूत पाईपलाईन टाकण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषद प्रशासनाने सांगितले की, दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. मात्र, ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, नागरिकांनी या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

