कुंझर गाव पाणी आणि वीज समस्येने त्रस्त २० ते २२ दिवसांनी येते पिण्याचे पाणी; ग्रामस्थांचा संताप

चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील दुर्गम भागातील कुंझर गाव सध्या भीषण पाणीटंचाई आणि वीज समस्येला सामोरे जात आहे. गावात पिण्याचे पाणी तब्बल २० ते २२ दिवसांनी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वापरण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी जगायचे कसे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना गावातील महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

विशेष म्हणजे गावात विविध कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम सुरू असताना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या विविध योजना कागदावरच राहिल्या असून प्रत्यक्षात गावकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.“आमच्या गावाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. नियमित पाणीपुरवठा, सुरळीत वीज सेवा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पाणी व वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

