साहेबांसाठी’ १० हजार, स्वतःसाठी ५ हजार भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक रंगेहाथ पकडला !

<img class

सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी १५ हजारांची लाच; भूकरमापक जितेंद्र पाटील एसीबीच्या जाळ्यात !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सातबारा उताऱ्यावरील नोंद दुरुस्तीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५, रा. भूषण कॉलनी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे शहरात वडिलोपार्जित घर आहे. संबंधित घराच्या कागदपत्रांमध्ये तक्रारदारांच्या काकांनी फेरफार करून घर स्वतःच्या नावावर करून घेतले होते, तसेच तक्रारदारांच्या वडिलांचे नाव कमी करण्यात आले होते. या प्रकरणी तक्रारदारांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांकडे अपील दाखल केले होते. त्या अपीलावर सुनावणी होऊन संबंधित नोंद रद्द करण्याचे तसेच तक्रारदारांच्या वडिलांचे नाव पुन्हा सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानुसार सातबारा उताऱ्यावर नोंद अद्ययावत करण्यासाठी तक्रारदारांनी २५ डिसेंबर २०२५ आणि ५ जून २०२६ रोजी अर्ज केले होते. मात्र, या अर्जांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने तक्रारदारांनी संबंधित कार्यालयात पाठपुरावा केला. १८ जून रोजी तक्रारदार कामाबाबत चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले असता, भूकरमापक जितेंद्र पाटील यांनी “तुमचे काम मी साहेबांशी बोलून करून देतो; मात्र त्यासाठी साहेबांसाठी १० हजार रुपये द्यावे लागतील आणि मला तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे द्या,” अशी मागणी केल्याचा आरोप आहे.यानंतर तक्रारदारांनी २५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केली असता, प्रलंबित काम करून देण्यासाठी जितेंद्र पाटील यांनी साहेबांसाठी १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि भूमी अभिलेख कार्यालयात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटील यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगिता पवार, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि मनोज पाटील यांच्या पथकाने केली.

