मुस्लीम शववाहीकेची जबाबदारी रजा टॉवर गुपने स्वीकारली

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे मुस्लिम बहुल भागांमधून कब्रस्तानापर्यंत जनाजा नेण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
मुस्लिम कॉलनी, चाळ, कंडारी तसेच 15 बंगला परिसरातून कब्रस्तानाचे अंतर अधिक असल्याने अनेक कुटुंबांना ट्रॅक्टर किंवा छोट्या वाहनांचा आधार घ्यावा लागत होता.

ही समस्या ओळखून दर्दमंदना फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक इल्यास शेख यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण करत जनाजा वाहन तयार करून घेतले. या वाहनाची जबाबदारी एखाद्या सामाजिक संस्थेने स्वीकारावी यासाठी त्यांनी शहरातील विविध फाउंडेशन आणि संस्थांशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान इल्यास शेख सर यांची पत्रकार सद्दाम खाटीक यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी जनाजा वाहनाबाबतची संपूर्ण माहिती देत ही सेवा समाजासाठी सुरू राहावी, अशी इच्छा व्यक्त केली.
यानंतर सद्दाम खाटीक यांनी तत्काळ रझा टॉवर ग्रुपचे मोहसिन काझी, निसार शेख, वसीम शेख आणि मुजाहिद शेख यांच्याशी संपर्क साधून या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता इल्यास शेख सर यांनी सद्दाम खाटीक यांच्या माध्यमातून जनाजा वाहनाची संपूर्ण जबाबदारी रझा टॉवर ग्रुपकडे सुपूर्द केली.

यावेळी सद्दाम खाटीक आणि मोहसिन काझी यांनी इल्यास शेख सर यांचे आभार मानत सांगितले की, ज्यांना जनाजा कब्रस्तानापर्यंत नेण्यासाठी वाहनाची आवश्यकता असेल त्यांनी सद्दाम खाटीक, मोहसिन काझी, निसार शेख, वसीम शेख तसेच रझा टॉवर ग्रुपच्या इतर सदस्यांशी संपर्क साधावा.
विशेष म्हणजे, ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित राहणार आहे.

