शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू”

जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२६
शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका,अन्यथा तीव्र आंदोलन उभारू” असा सज्जड इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी दिला आहे.
यावल रावेर तालुक्यासह आपल्या जळगाव जिल्ह्यात नुकताच एमएसईबी विभागामार्फत रात्रीच्या वेळेस जंगल फिडरवरील वीजपुरवठ्यामध्ये दोन तासांची कपात करण्यात आलेली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होत होता,मात्र वाढत्या उन्हामुळे वीजेचा वापर वाढल्याचे कारण देत आता ही कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, विशेषतः रावेर,यावल,चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी बागांची कापणी सुरू असून नवीन लागवडीचे कामही याच कालावधीत मोठ्या प्रमाणावर सुरू असते.अशा परिस्थितीत शेतीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते आणि विज पुरवठा सुरळीत नियमित असल्याशिवाय ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही.त्यामुळे रात्रीच्या वीजपुरवठ्यात कपात करणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
आधीच पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रासायनिक खतांची महागाई आणि उत्पादन खर्चामुळे तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी हवालदिल झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यातच आता शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा कमी होत असेल, तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही.
अशा तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ( पूर्व ) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी शासन आणि वीज वितरण कंपनीला / प्रशासनाला इशारा दिला आहे की, तात्काळ विच पुरवठ्याची कपात मागे घेऊन पूर्ववत नियमित आठ तास वीजपुरवठा सुरू करण्यात यावा. अन्यथा जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

