यावल-भुसावळ मार्गावर भरधाव डंपरचा कहर! डंपरच्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – यावल-भुसावळ रस्त्यावरील अंजाळे गावाजवळील मोर नदी पुलावर भरधाव डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तापी नदी परिसरातून गौण खनिज वाहतूक करणारा डंपर (क्र. एमएच-१९ सीवाय-६६५१) भरधाव वेगाने जात असताना भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच-१९ डीयू-६५२१) जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालक लखन अशोक जोहरी (वय ३०, रा. बडगुजर गल्ली, यावल) यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातावेळी मोटारसायकलवर मागे बसलेल्या अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले.
दरम्यान, तापी नदी परिसरातून होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीतील डंपर आणि इतर अवजड वाहने अनेकदा भरधाव वेगाने धावत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहेत. तसेच वाळू, माती, खडी व मुरूम वाहतूक करताना वाहनांवर ताडपत्री न टाकल्याने रस्त्यावर धूळ उडून अपघाताचा धोका वाढत असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.या प्रकरणी यावल पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत लखन जोहरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे यावल शहरातील बडगुजर गल्ली परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

