Saturday, May 30, 2026
Homeगुन्हाभुसावळ लाचखोरी प्रकरण : लाच मागणीचे संभाषण रेकॉर्ड, उपनिरीक्षक रजेवर; एसीबीकडून शोधमोहीम...

भुसावळ लाचखोरी प्रकरण : लाच मागणीचे संभाषण रेकॉर्ड, उपनिरीक्षक रजेवर; एसीबीकडून शोधमोहीम सुरू !

भुसावळ लाचखोरी प्रकरण : लाच मागणीचे संभाषण रेकॉर्ड, उपनिरीक्षक रजेवर; एसीबीकडून शोधमोहीम सुरू !

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – २० हजार रुपयांच्या लाच मागणी प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा कथित खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी (वय ४६, रा. कुरेशी मोहल्ला, बोदवड) यांच्याविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सलीम कुरेशी याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रकरणातील मुख्य संशयित उपनिरीक्षक सांगळे हे रजेवर असून त्यांचा एसीबीकडून शोध सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च २०२६ रोजी खडका चौफुली परिसरात झालेल्या किरकोळ मारहाण प्रकरणानंतर संबंधितांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी उपनिरीक्षकाने संशयित व तक्रारदाराच्या पत्नीमार्फत ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.यासंदर्भात तक्रारदाराने ७ एप्रिल रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अटक न करता ‘चॅप्टर केस’ करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती व नंतर २० हजार रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सापळा रचला. मात्र, लाच रक्कम स्वीकारताना संशय आल्याने सापळा पूर्णतः यशस्वी झाला नाही. तरीही एसीबीने तपासादरम्यान खाजगी पंटर सलीम कुरेशी याच्याशी झालेल्या संभाषणाचे ध्वनिमुद्रण व इतर पुरावे संकलित केले. त्यानंतर एसीबीने कारवाई करत सलीम कुरेशी याला अटक केली.

 

या प्रकरणातील उपनिरीक्षक राजू सांगळे सध्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या