भुसावळात पहाटेचे कोंबिंग ऑपरेशन; गावठी कट्टा, तलवारींसह शस्त्रसाठा जप्त !

हद्दपार व वाँटेड आरोपी ताब्यात; २३ संशयित वाहने जप्त,९९ जणांची पडताळणी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भुसावळ पोलिसांनी बुधवारी (10 जून) पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेदरम्यान व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत पसार, हद्दपार तसेच वाँटेड आरोपींच्या निवासस्थानी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. संशयित व्यक्ती व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान चार जणांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दोन तलवारी आणि चॉपर जप्त करण्यात आला. तसेच खंडवा लोहमार्ग पोलिसांना हवा असलेला एक आरोपी आणि एका हद्दपार आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अपर पोलीस अधीक्षक गावीत यांनी सांगितले की, कोंबिंग ऑपरेशनदरम्यान समीर शहा जब्बार शहा (रा. दिनदयाल नगर, भुसावळ) याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तर शम्मी प्रल्हाद चावरीया आणि दानिश शेख शकील यांच्या ताब्यातून तलवारी हस्तगत करण्यात आल्या. तसेच अनिल टाक याच्याकडून चॉपर जप्त करण्यात आला. या चौघांविरोधात स्वतंत्रपणे शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कारवाईदरम्यान संदीप बुधा खंदारे हा वर्षभरासाठी हद्दपार असतानाही शहरात वावरताना आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इराणी वस्ती परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत सल्तनत अली इराणी (रा. पापानगर, भुसावळ) हा खंडवा लोहमार्ग पोलिसांना हवा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.अपर पोलीस अधीक्षक गावीत यांनी सांगितले की, या विशेष मोहिमेदरम्यान एकूण 63 संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली, तर 99 संशयितांची पडताळणी करण्यात आली. याशिवाय रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विविध लॉजेसची सखोल तपासणी करण्यात आली. पोलिसांनी 112 वाहनांची तपासणी करून 23 संशयित वाहने जप्त केली असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या तपासातून वाहन चोरीसारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरातील मच्छीवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आलेली दुचाकी (एमएच-18 बीडब्ल्यू-6155) जप्त करण्यात आली. चौकशीत ही दुचाकी चोपडा शहर हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाल्याने ती पुढील तपासासाठी चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.याशिवाय भुसावळ तालुक्यातील शिवपूर-कन्हाळा परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, बोदवड पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे यांच्यासह 20 प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे 45 अंमलदार, जळगाव परिमंडळातील 111 पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे 27 कर्मचारी आणि 15 महिला पोलिसांचा सहभाग होता.

