Thursday, June 11, 2026
Homeजळगाववांजोळा चौफुली ठरत आहे ‘अपघातांचा सापळा’; महिनाभरात १० भीषण अपघातांनी वाढवली चिंता...

वांजोळा चौफुली ठरत आहे ‘अपघातांचा सापळा’; महिनाभरात १० भीषण अपघातांनी वाढवली चिंता !

नियमबाह्य कट, भरधाव वाहने आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुली (वांजोळा रोड) परिसर सध्या अपघातांचे हॉटस्पॉट बनला असून, गेल्या अवघ्या एका महिन्यात येथे तब्बल दहा भीषण अपघात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.नाहाटा चौक उड्डाणपुलावरून उतरणारी वाहने तसेच जळगावकडून भुसावळकडे येताना रेल्वे उड्डाणपुलाच्या उतारावरून येणारी वाहने मोठ्या वेगाने या चौकात प्रवेश करतात. दोन्ही बाजूंनी उताराचा रस्ता असल्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नसल्याचे दिसून येते. त्यातच महामार्गावरील नियमबाह्य आणि अनधिकृत वळणांमुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे.वांजोळा चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती असून दिवसभर वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचा धोका अधिक गंभीर बनला आहे.

तीन वर्षांत ४७ अपघात; ४५ जणांचा मृत्यू

दीपनगर ते नशिराबाद या सुमारे 28 किलोमीटरच्या महामार्ग पट्ट्यात गेल्या तीन वर्षांत 47 गंभीर अपघातांची नोंद झाली असून, त्यात 45 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वांजोळा रोड परिसराचा अधिकृतपणे ‘ब्लॅकस्पॉट’ अर्थात अतिसंवेदनशील अपघातप्रवण क्षेत्र म्हणून समावेश करण्यात आला आहे.

सुरक्षा उपाययोजनांची गरज

स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्गावरील नियमबाह्य कट आणि वळणे तातडीने बंद करणे आवश्यक आहे. तसेच चौकात योग्य रस्ता दुभाजक, चेतावणी फलक, प्रकाश व्यवस्था आणि इतर सुरक्षा उपाययोजना राबविल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. याशिवाय उड्डाणपुलाच्या उतारावर गतीरोधक किंवा वेग नियंत्रणासाठी इतर उपाययोजना केल्यास अपघात रोखण्यास मदत होईल, असे नागरिकांचे मत आहे.

अनधिकृत कट बंद होणार

या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले की, वांजोळा चौफुलीवरील अनधिकृतपणे तयार करण्यात आलेले कट हेच अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता हे सर्व कट मजबूत दुभाजक उभारून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत.“कोणत्याही शॉर्टकटपेक्षा नागरिकांचा जीव आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. वाहनचालकांनी नाहाटा चौफुली उड्डाणपुलाखालून उपलब्ध असलेल्या अधिकृत आणि सुरक्षित मार्गाचा वापर करावा,” असे आवाहन साळुंखे यांनी केले.

नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.“राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी अधिकृत प्रवेश (Entry) आणि निर्गमन (Exit) मार्ग उपलब्ध आहेत, त्याच मार्गांचा वापर करावा. बॅरिकेड तोडून अथवा रस्त्यामध्ये अनधिकृत मार्ग तयार करून वाहतूक करणे धोकादायक असून ते नियमबाह्य आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित राहू शकतो,” असे बारबोले यांनी सांगितले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या