Sunday, June 14, 2026
Homeजळगावबम बम भोले च्या जयघोषात भुसावळचे शिवभक्त कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना!

बम बम भोले च्या जयघोषात भुसावळचे शिवभक्त कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना!

बम बम भोले च्या जयघोषात भुसावळचे शिवभक्त कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना!

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

हिंदू धर्मात अत्यंत पवित्र,परंतु भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कठीण व अवघड मानल्या जाणाऱ्या ‘कैलास मानसरोवर’ यात्रेसाठी भुसावळ शहरातील शिवभक्तांचा जथा नुकताच भक्तिमय वातावरणात रवाना झाला.

भुसावळ रेल्वे स्थानकावर भाविकांनी ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’चा एकच जयघोष केल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. नातेवाईक,मित्रपरिवार आणि शहरातील नागरिकांनी यात्रेकरूंना पुष्पहार अर्पण करून व पेढे भरवून कैलास मानसरोवर यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

भुसावळचे हे भाविक रवाना

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या कडक वैद्यकीय आणि शारीरिक पात्रता चाचणीत उत्तीर्ण होऊन भुसावळच्या भाविकांना या ऐतिहासिक यात्रेचा बहुमान मिळाला आहे.

यामध्ये शहरातील कल्पेश फालक,सागर हिंगणे,विनय पटेल,ओम भंगाळे,मेहुल भंगाळे,विजय पटेल,मृणाल कलाल,मयुर गुंजाळ,संजय प्रजापती,कमल प्रजापती,अनिल पाटील व रितेश भारंबे या शिवभक्तांचा समावेश आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे १९ हजार फूट उंचीवर असलेल्या कैलास पर्वताची परिक्रमा आणि मानसरोवर तलावाची यात्रा ही जगातील सर्वात खडतर व पवित्र अशी तीर्थयात्रा मानली जाते. अत्यंत कमी ऑक्सिजन,उणे तापमान आणि कठीण चढाई अशा आव्हानांचा सामना करत भाविकांना हा प्रवास करावा लागतो.मात्र, महादेवाच्या दर्शनाची ओढ आणि मनात असलेला दृढ विश्वास यांमुळे भुसावळच्या या तरुणांमध्ये आणि भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

भुसावळ येथून निघालेला हा जथा सर्वप्रथम नवी दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘कैलास मानसरोवर भवन’ येथे पोहोचेल. तिथे त्यांची अंतिम वैद्यकीय तपासणी आणि विशेष प्रशिक्षण होईल. त्यानंतर अधिकृत मार्गाने (लिपुलेख खिंड किंवा नथुला पास) हे भाविक तिबेटमधील कैलास मानसरोवरकडे मार्गस्थ होतील.

 

भोलेनाथाच्या दरबारात जाण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. प्रवास कठीण नक्कीच आहे, पण सर्व भुसावळकरांच्या शुभेच्छा आणि शिवरायांच्या कृपेने आमची ही परिक्रमा सुरक्षित आणि यशस्वी होईल असा ठाम विश्वास आहे अशी भावना यात्रेला रवाना झालेले भुसावळचे भाविक कल्पेश फालक यांनी व्यक्त केली.

या वेळी रेल्वे स्थानकावर भुसावळ शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते, यात्रेकरूंचे कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनीच या सर्व भाविकांचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा अशी प्रार्थना केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या