Sunday, June 14, 2026
Homeगुन्हाजुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला; लोखंडी हुकने गळ्यावर वार, दोघांना अटक

जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला; लोखंडी हुकने गळ्यावर वार, दोघांना अटक

जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला; लोखंडी हुकने गळ्यावर वार, दोघांना अटक

 

भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील यशवंत नगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून ४५ वर्षीय महिलेवर धारदार लोखंडी हुकने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १२) रात्री घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.

 

जखमी कविता सुरेश पाटील (रा. यशवंत नगर, भडगाव) यांच्यावर जुन्या वादातून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी असलम बिस्मिल्ला शेख व शमीन असलम शेख (दोघे रा. यशवंत नगर, भडगाव) यांनी संगनमत करून कविता पाटील यांना शिवीगाळ व मारहाण केली.त्यानंतर असलम शेख याने कविता पाटील यांना घरात ओढून नेत हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार लोखंडी हुकने गळ्यावर दोन ते तीन वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 

या प्रकरणी जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई केली. आरोपी असलम बिस्मिल्ला शेख याला भडगाव येथून ताब्यात घेण्यात आले, तर महिला आरोपी शमीन असलम शेख हिला चाळीसगाव परिसरातून अटक करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या