इमरान मरेखा तडवी यांची मुख्याध्यापकपदी

पदोन्नती; तडवी समाजातून शुभेच्छांचा वर्षाव
फैजपुर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
येथील बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षक इमरान मरेखा तडवी यांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्याने शैक्षणिक, सामाजिक तसेच तडवी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इमरान तडवी यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तप्रियता, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा व शैक्षणिक अनुभवाचा विचार करून संस्थेने
त्यांच्यावर मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच तडवी समाजासाठीही ही अभिमानाची बाब असून शिक्षण क्षेत्रात समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याच्या भावना समाज बांधवांनी व्यक्त केल्या.
इमरान तडवी यांच्या या यशाबद्दल तडवी टायगर ग्रुप फैजपुर, तडवी समाजातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय प्रगतीची नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त करून सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

