शैक्षणिक संस्थेत कोट्यवधींचा घोटाळा! लेखापालानेच केला ४.८५ कोटींचा अपहार; आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क तसेच संस्थेच्या नावे आलेले धनादेश बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरत तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या शिरसोली रोडवरील महाविद्यालयातील लेखापाल लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळात लोकेश कोल्हे हा लेखापाल म्हणून कार्यरत होता. १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुल्कापोटी जमा केलेली रक्कम तसेच संस्थेच्या नावाने प्राप्त झालेले धनादेश वटवून ती रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या वापरासाठी वळवल्याचा आरोप आहे.प्रकरण उघडकीस आल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. त्यानुसार लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयाला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. तसेच या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

