ब्रिटनची राजकीय व्यवस्था, संसद आणि लोकशाही संस्थांचा अभ्यास करणार : प्रा.डॉ.सुनील नेवे !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक व सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. सुनील नेवे हे दिनांक 26 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत इंग्लंडमधील लंडन येथे आयोजित अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश ब्रिटनची संसदीय लोकशाही,राजकीय व्यवस्था, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक धोरणे व प्रशासन यांचा प्रत्यक्ष अभ्यास करणे हा आहे.
जगातील सर्वात प्राचीन व प्रभावशाली लोकशाही व्यवस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्रिटिश संसदीय परंपरेचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः भारताच्या संसदीय व्यवस्थेवर ब्रिटिश परंपरेचा मोठा प्रभाव असल्याने या अभ्यासातून भारतीय लोकशाहीची तुलनात्मक समज अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे.
या दौऱ्यात प्रा.नेवे यांना ब्रिटनच्या संसद भवनाला भेट देऊन हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, पार्लमेंट स्क्वेअर, वेस्टमिन्स्टर ॲबे या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन ब्रिटिश लोकशाहीच्या विकासाचा इतिहास जाणून घेता येणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) या जागतिक कीर्तीच्या संस्थेला भेट देणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.सामाजिक विज्ञान, सार्वजनिक धोरण,आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकीय संशोधन क्षेत्रातील आधुनिक प्रवाहांचा अभ्यास करण्याची संधी या भेटीतून मिळणार आहे.याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान, ब्रिटिश म्युझियम, नेहरू सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन यांसारख्या संस्थांना भेट देऊन भारतीय विचारवंतांचा जागतिक प्रभाव,शिक्षणव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यादरम्यान ब्रिटनमधील स्थानिक स्वराज्य व्यवस्था, सार्वजनिक सेवा वितरण प्रणाली,नागरी प्रशासन,शहरी नियोजन, नागरिकांचा राजकीय सहभाग आणि लोकशाही संस्थांची कार्यक्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर विशेष भर राहणार आहे. तसेच ब्रिटन आणि भारताच्या राजकीयव्यवस्थांमधील साम्य व भिन्नता यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यावरील निरीक्षणे संशोधनात्मक स्वरूपात मांडण्याचा मानस प्रा. नेवे यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय प्रा. सुनील नेवे यांची लंडनमधील Institute of Historical Research, School of Advanced Study, University of London या प्रतिष्ठित संस्थेमार्फत आयोजित “History of Political Ideas Seminar” या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी निवड झाली असून ते दिनांक 1 जुलै 2026 रोजी या सेमिनारमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
राजकीय विचारांचा इतिहास, लोकशाही मूल्यांचा विकास, आधुनिक राज्यव्यवस्थेची वैचारिक पायाभरणी आणि जागतिक राजकीय विचारप्रवाह यांसारख्या विषयांवर या चर्चासत्रात अभ्यासक, संशोधक आणि प्राध्यापकांमध्ये विचारमंथन होणार आहे. या सेमिनारमधील सहभागामुळे जागतिक स्तरावरील संशोधन व शैक्षणिक प्रवाहांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्रा. नेवे यांना मिळणार आहे. या सहभागामुळे विद्यार्थ्यांना जागतिक राजकीय विचारसरणी, लोकशाही संस्था आणि संशोधन पद्धती यांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.तसेच प्रा.सुनील नेवे हे लंडनमधील ऐतिहासिक Royal Courts of Justice या न्यायसंस्थेलाही भेट देणार आहेत.इंग्लंड आणि वेल्समधील सर्वोच्च नागरी न्यायालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची न्यायव्यवस्था, न्यायनिर्णय प्रक्रिया,न्यायालयीन परंपरा आणि कायद्याचे राज्य (Rule of Law) या संकल्पनांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ,कार्यपालिका आणि न्यायपालिका या तीन प्रमुख स्तंभांपैकी न्यायपालिकेची भूमिका समजून घेण्यासाठी ही भेट विशेष महत्त्वाची ठरणार आहे. लभारतीय राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेवर ब्रिटिश कायदेविषयक परंपरेचा मोठा प्रभाव असल्यामुळे ब्रिटनच्या न्यायसंस्थेचा अभ्यास भारतीय न्यायप्रणालीच्या तुलनात्मक आकलनासाठी उपयुक्त ठरणार आहे. न्यायिक स्वातंत्र्य, घटनात्मक मूल्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण यांसारख्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा अभ्यास या भेटीद्वारे करण्यात येणार आहे.
प्रा.नेवे हे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, संविधानिक जाणीव आणि राजकीय साक्षरता निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या अभ्यास दौऱ्यातून प्राप्त होणारे अनुभव व ज्ञान विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ब्रिटिश संसद,न्यायव्यवस्था, शैक्षणिक संस्था,ऐतिहासिक वारसा आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्रांचा समावेश असलेला हा अभ्यास दौरा प्रा. सुनील नेवे यांच्यासाठी राज्यशास्त्र विषयाच्या अध्यापन,संशोधन आणि सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.ब्रिटिश संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था,राजकीय विचारांचा इतिहास आणि आधुनिक प्रशासन यांचा प्रत्यक्ष अभ्यास करून ते विद्यार्थ्यांसमोर जागतिक राजकीय व्यवस्थेचे व्यापक चित्र मांडणार आहेत. त्यामुळे हा दौरा केवळ परदेशभेट न राहता एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम ठरणार असल्याचे मत विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.व प्रा डॉ.सुनिल नेवे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. “ब्रिटिश लोकशाहीच्या अभ्यासातून भारतीय लोकशाही अधिक सक्षमपणे समजून घेणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत क राजकीय घडामोडींचे ज्ञान पोहोचवणे हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे,” असे प्रा. सुनील नेवे यांनी सांगितले.