भुसावळ-पंढरपूर आषाढी विशेष गाडी रवाना
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा;
भाविकांना रेल्वेची मोफत सुविधा

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेली भुसावळ–पंढरपूर आषाढी विशेष गाडी (क्र. ०११५९) शुक्रवारी (ता. २४) भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात भुसावळ स्थानकावरील आठ नंबर प्लॅट फार्महुन रवाना झाली आहे . या रेल्वेचा सालाबादप्रमाणे भुसावळ , रावेर,यावल , मुक्ताईनगर , जामनेर , बोदवड सह हजारो वारकरी महिला पुरुष यांनी लाभ घेतला . केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे दरवर्षी भाविकांना या रेल्वेचे सर्व तिकीट खरेदी करून भाविकांना मोफत पंढरपूर वारी घडवित असतात .
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भुसावळ विभागाचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रवीण कुमार पाठक , यांच्या हस्ते विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, झेडआरयूसीसी सदस्य, तसेच रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
.आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. गाडी सुटण्यापूर्वी भाविकांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल नामाचा जयघोष केला. सर्व प्रवाशांनी नियोजित कोचमध्ये सुरक्षितपणे प्रवेश केल्यानंतर गाडी वेळापत्रकानुसार सुरळीतपणे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली .

