Tuesday, July 28, 2026
Homeजळगावफेकरी ग्रामपंचायतीकडून माहितीच्या अधिकाराला हरताळ?; प्रथम अपीलाच्या आदेशानंतरही ११५ दिवस माहितीच नाही!

फेकरी ग्रामपंचायतीकडून माहितीच्या अधिकाराला हरताळ?; प्रथम अपीलाच्या आदेशानंतरही ११५ दिवस माहितीच नाही!

प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली; कायद्याचे उघड उल्लंघन?

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील फेकरी ग्रामपंचायतीवर माहितीचा अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीत गंभीर हलगर्जीपणाचे आरोप झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त वर्ग-१ अधिकारी विठ्ठल बुधो तायडे यांनी १ एप्रिल २०२६ रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर कायद्यानुसार माहिती न देता, प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचा आदेश होऊनही तब्बल ११५ दिवस उलटून गेल्यानंतरही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तायडे यांनी सन २००६-०७ ते २०२५-२६ या कालावधीतील मागासवर्गीय ग्रामनिधीचा वापर, ग्रामसभा व मासिक सभांचे इतिवृत्त, विकास आराखडे, लेखापरीक्षण अहवाल, स्वच्छ भारत अभियान, दलित वस्ती विकास योजना, विविध शासकीय निधीचा खर्च, बिले-पावत्या तसेच स्वच्छ सर्वेक्षणाशी संबंधित कागदपत्रांची माहिती मागितली होती.कायद्यातील ३० दिवसांची मुदत संपूनही माहिती न मिळाल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केले. त्यानंतर पंचायत समिती भुसावळ येथील प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेत १० दिवसांत संपूर्ण माहिती विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यावर माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम २०(१) अन्वये दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
तरीदेखील आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा दावा अर्जदाराने केला असून, हे प्रकरण केवळ एका अर्जापुरते मर्यादित नसून ग्रामपंचायतीतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.दरम्यान, प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही माहिती न मिळाल्यास संबंधित अर्जदाराला महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या