आषाढी एकादशीनिमित्त संतांची वेशभूषा करून शाळेत दिंडी सोहळा उत्साहात.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२७ येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा करीत दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात इयत्ता सेमी इंग्लिश व नर्सरी ते चौथीच्या सेमी व इंग्लिश विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत नामदेव, मुक्ताबाई,सोपानदेव आदी संतांची वेशभूषा साकारली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका रंजना महाजन व दीपाली धांडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीतील विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर स्वामी विवेकानंद केंद्रापासून ते पूर्णवाद नगरपर्यंत दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाळ,मृदुंग,झांज यांच्या गजरात अभंग व गवळणी सादर करत परिसर भक्तिमय केला.तसेच “झाडे लावा, झाडे जगवा”, “स्वच्छ परिसर,सुंदर परिसर” आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” असे सामाजिक संदेश देत जनजागृती केली.
या दिंडी सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, गौरी भिरूड व राजश्री लोखंडे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

