Tuesday, July 28, 2026
Homeगुन्हागांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना चोपडा ग्रामीण पोलिसांकडून अटक

गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना चोपडा ग्रामीण पोलिसांकडून अटक

गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना चोपडा ग्रामीण पोलिसांकडून अटक
७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; हातेड शिवारातील कारवाई
चोपडा :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह ह्युंदाई सॅन्ट्रो कार, पल्सर मोटारसायकल आणि पाच मोबाईल असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. २६ जुलै रोजी रात्री लासूर ते हातेड रस्त्यावरील हातेड शिवारात पाटचारीजवळ ही कारवाई करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत गोपनीय माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना गोपनीय माहितीच्या आधारे अमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
२६ जुलै रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावर पाटचारीजवळ, हातेड शिवारात काही इसम गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना ह्युंदाई कंपनीची सॅन्ट्रो कार (एमएच १४ बीके ३११३) आढळून आली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ७ किलो ११६ ग्रॅम गांजा मिळून आला.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट) १९८५ मधील कलम २० (ब) व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
जप्त मुद्देमाल
७ किलो ११६ ग्रॅम गांजा – किंमत १ लाख ७७ हजार ९०० रुपये
ह्युंदाई सॅन्ट्रो कार (एमएच १४ बीके ३११३) – किंमत ३ लाख रुपये
पल्सर मोटारसायकल (एमएच १७ डीएल ४५९८) – किंमत ९० हजार रुपये
पाच मोबाईल फोन – किंमत ४१ हजार रुपये
एकूण जप्त मुद्देमाल – ६ लाख ८ हजार ९०० रुपये
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ) आणि चोपडा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईच्या पथकात पोलिस उपनिरीक्षक , पोलिस कॉन्स्टेबल किरण पारधी, पोलिस कॉन्स्टेबल गजानन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल चेतन महाजन, पोलिस कॉन्स्टेबल निलेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद पवार, पोलिस कॉन्स्टेबल विनोद पवार आणि पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम अहिरे यांचा समावेश होता. या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली.
या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या