Wednesday, August 26, 2026
Homeजळगावउदयपूर सिटी पॅलेसमध्ये रणजितसिंग राजपूत लिखित ‘स्वाभिमानाचे रणधुरंधर – महाराणा प्रताप’ या...

उदयपूर सिटी पॅलेसमध्ये रणजितसिंग राजपूत लिखित ‘स्वाभिमानाचे रणधुरंधर – महाराणा प्रताप’ या मराठी ग्रंथाचे भव्य लोकार्पण सोहळा .   

उदयपूर सिटी पॅलेसमध्ये रणजितसिंग राजपूत लिखित ‘स्वाभिमानाचे रणधुरंधर – महाराणा प्रताप’ या मराठी ग्रंथाचे भव्य लोकार्पण सोहळा .                        भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 महाराणा प्रतापांच्या ७७ व्या वंशज श्रीजी हुजूर डॉ. लक्ष्यराज सिंह मेवाड यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा; स्वाभिमान, राष्ट्रधर्म आणि युवा प्रेरणेचा संदेश .

इतिहास हा केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नसून तो राष्ट्राच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा जिवंत वारसा असतो. अशाच या गौरवशाली वारशाला मराठी भाषेतून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, संशोधक, लेखक व फिट इंडिया अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर रणजितसिंग राजपूत यांनी ‘स्वाभिमानाचे रणधुरंधर – महाराणा प्रताप’ हा ग्रंथ लिहिला आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अद्वितीय जीवनकार्यावर आधारित हा ग्रंथ महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, त्याग, पराक्रम आणि नेतृत्वाची प्रेरणा जागविणारा ठरणार आहे. या ऐतिहासिक ग्रंथाचे लोकार्पण राजस्थानातील उदयपूर येथील जगप्रसिद्ध सिटी पॅलेस या राजमहालात अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडले. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी महाराणा प्रताप यांचे ७७ वे वंशज, मेवाडचे ७७ वे श्री एकलिंग दीवान, आदरणीय श्रीजी हुजूर डॉ. लक्ष्यराज सिंह मेवाड यांनी रणजितसिंग राजपूत व त्यांच्या संपूर्ण परिवाराला विशेष निमंत्रण देऊन सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते. मेवाडच्या राजघराण्याच्या साक्षीने आणि ऐतिहासिक परंपरेच्या सन्मानपूर्वक वातावरणात झालेला हा सोहळा मराठी साहित्यविश्वासाठी तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासासाठी अभिमानाचा क्षण ठरला. मराठी भाषेत महाराणा प्रताप यांच्यावर अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा स्वतः श्रीजी हुजूर डॉ. लक्ष्यराज सिंह मेवाड यांच्या मार्गदर्शनातून मिळाल्याचे रणजितसिंग राजपूत यांनी सांगितले. त्यांच्या प्रेरणेनेच अनेक ऐतिहासिक संदर्भ, मेवाडच्या परंपरा, सनातन मूल्ये आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा सखोल अभ्यास करून हा ग्रंथ साकारण्यात आला. त्यामुळे या पुस्तकाचे लोकार्पण मेवाडच्या राजमहालात त्यांच्या हस्ते होणे ही लेखकासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यविश्वासाठी गौरवाची बाब ठरली.

या ऐतिहासिक भेटीदरम्यान रणजितसिंग राजपूत यांनी आपल्या हस्ते लिहिलेल्या ‘स्वाभिमानाचे रणधुरंधर – महाराणा प्रताप’ या ग्रंथाची प्रथम प्रत श्रीजी हुजूर डॉ. लक्ष्यराज सिंह मेवाड यांना सादर अर्पण केली. त्यानंतर मेवाडच्या गौरवशाली इतिहास, भारतीय संस्कृती, सनातन परंपरा, राष्ट्रधर्म, कला, स्थापत्य, नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि आजच्या युवकांनी इतिहासातून काय शिकावे याविषयी अत्यंत प्रेरणादायी चर्चा झाली. श्रीजी हुजूर यांनी लेखकाच्या संशोधनवृत्तीचे, इतिहासावरील प्रेमाचे आणि मराठी भाषेतून मेवाडचा तेजस्वी इतिहास जनमानसात पोहोचविण्याच्या प्रयत्नाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी अशा साहित्यनिर्मितीची आजच्या काळात मोठी आवश्यकता असल्याचे सांगत रणजितसिंग राजपूत यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राजघराण्याच्या परंपरेचा अनुभव, ऐतिहासिक वास्तूंचे वैभव, मेवाडच्या अस्मितेचा गौरव आणि महाराणा प्रताप यांच्या संघर्षमय जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलू यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी लाभली. हा सोहळा केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्र आणि मेवाड यांच्यातील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि भारतीय इतिहासाच्या गौरवशाली परंपरेला नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा ऐतिहासिक क्षण ठरला. मराठी भाषेतून महाराणा प्रताप यांचे जीवन आणि विचार प्रभावीपणे मांडण्याचा हा प्रयत्न भविष्यात इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि युवकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

रणजितसिंग राजपूत यांचा प्रवास हा सामाजिक बांधिलकी, राष्ट्रसेवा आणि युवक सक्षमीकरणाचा आदर्श मानला जातो. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत त्यांना सन २०२१ चा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून हा देशातील युवकांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. त्याचबरोबर ते फिट इंडिया अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून देशभरात आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देत आहेत. संशोधन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून भारत सरकारच्या विविध प्रधानमंत्री योजनांच्या प्रभाव मूल्यांकनासाठी ते गोवा राज्यात रिसर्च ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण विकास, सामाजिक परिवर्तन, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचे परिणाम, जनसहभाग आणि सार्वजनिक धोरणांच्या अभ्यासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. लेखक, संशोधक आणि समाजसेवक या तिन्ही भूमिका प्रभावीपणे निभावत असताना त्यांनी इतिहास आणि राष्ट्रप्रेम यांची सांगड घालणारे साहित्य निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. ‘स्वाभिमानाचे रणधुरंधर – महाराणा प्रताप’ हा ग्रंथ केवळ चरित्रग्रंथ नसून तो स्वाभिमान, त्याग, राष्ट्रनिष्ठा, नेतृत्व, संघर्ष, आत्मविश्वास आणि मातृभूमीप्रती अखंड समर्पण यांचे जीवनमूल्य सांगणारा प्रेरणाग्रंथ आहे. विशेषतः युवकांना इतिहासातून ऊर्जा मिळावी, स्वत्वाची जाणीव व्हावी आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाची प्रेरणा मिळावी हा या ग्रंथामागील प्रमुख हेतू आहे. महाराणा प्रताप यांच्या संघर्षातून संकटांवर मात करण्याची जिद्द, स्वराज्याची भावना, स्वाभिमानासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी आणि राष्ट्र प्रथम हा विचार प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचविण्याचे कार्य हा ग्रंथ करतो.

उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये झालेला हा लोकार्पण सोहळा हा एका लेखकाचा वैयक्तिक सन्मान नसून मराठी भाषा, महाराष्ट्राची साहित्यपरंपरा आणि भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाचा गौरव आहे. मेवाडच्या राजघराण्याने एका मराठी लेखकाला दिलेला हा सन्मान महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यातील सांस्कृतिक ऐक्य अधिक दृढ करणारा ठरला आहे. स्वाभिमान, संस्कृती, राष्ट्रधर्म आणि इतिहास यांचा संगम घडविणाऱ्या या ग्रंथामुळे युवकांमध्ये राष्ट्रीय चारित्र्य, सामाजिक उत्तरदायित्व आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भविष्यात हा ग्रंथ शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये, इतिहास अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी संदर्भग्रंथ ठरेल. स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या या कार्यात समाजातील सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून इतिहासाच्या पुनर्जागरणासाठी असे साहित्य अधिकाधिक प्रमाणात निर्माण होण्याची गरज अधोरेखित होत आहे. मेवाडच्या भूमीतून सुरू झालेला हा प्रेरणेचा प्रवास महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील युवकांच्या मनात स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेची अखंड ज्योत प्रज्वलित करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“स्वाभिमान हा वारसा नसतो; तो आपल्या विचारांनी, त्यागाने आणि कर्माने घडवावा लागतो. महाराणा प्रतापांचे जीवन प्रत्येक भारतीयाला संकटांशी लढण्याची, राष्ट्रासाठी जगण्याची आणि स्वत्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याची प्रेरणा देते. इतिहास वाचू नका, इतिहासातून स्वतःला सिद्ध करा हे अधो रेखित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या