Saturday, August 8, 2026
Homeजळगावमिशन ग्रीन’मध्ये इनरव्हील क्लब भुसावळचा सहभाग; ११ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

मिशन ग्रीन’मध्ये इनरव्हील क्लब भुसावळचा सहभाग; ११ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

‘मिशन ग्रीन’मध्ये इनरव्हील क्लब भुसावळचा सहभाग; ११ हजार वृक्षलागवडीचा संकल्प

भुसावळ :   खानदेश तुला इंग्लिश प्रतिनिधी     जय गणेश फाउंडेशन आणि दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट रोजी भुसावळ येथील एमआयडीसी परिसरात ‘मिशन ग्रीन’ उपक्रमांतर्गत ११ हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमात इनरव्हील क्लब भुसावळनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.‘एक झाड आईच्या नावाने’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव घुगे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याचा परिणाम जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, अल निनोचा प्रभाव, मान्सूनचे उशिरा आगमन आणि पर्जन्यमानातील घट अशा विविध स्वरूपात जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने वृक्षलागवड करून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या उपक्रमात इनरव्हील क्लब भुसावळच्या अध्यक्षा सविता शुक्ला, आयपीपी सुनंदा भारुले तसेच पास्ट प्रेसिडेंट किरण शुक्ला यांची उपस्थिती होती. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.
दरम्यान, पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची सायकल रॅलीही काढण्यात आली. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सायकलसारख्या प्रदूषणमुक्त वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचा संदेश देत ‘मिशन ग्रीन’ उपक्रमाने भुसावळमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक जनजागृती घडवून आणली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या