Sunday, August 9, 2026
Homeजळगावअध्यात्मिक शास्त्रोक्त मान्यता असलेल्या सरस्वती देवीच्या नावाला काळा डाग ?

अध्यात्मिक शास्त्रोक्त मान्यता असलेल्या सरस्वती देवीच्या नावाला काळा डाग ?

अध्यात्मिक शास्त्रोक्त मान्यता असलेल्या सरस्वती देवीच्या नावाला काळा डाग ?

विद्यार्थ्याजवळ गुप्ती आढळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर… !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण एका विद्यार्थ्याजवळ गुप्ती आढळल्याची चर्चा — प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत न पोहोचल्याने पालकांमध्ये चिंता एका शैक्षणिक संस्थेत दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणाच्या घटनेत एका विद्यार्थ्याजवळ धारदार शस्त्र म्हणजे गुप्ती आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारच्या घटना शाळेच्या परिसरात घडणे ही चिंतेची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर शाळेच्या प्रशासनाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्याऐवजी शाळेची बदनामी होऊ नये,या कारणाने प्रकरण पोलीस ठाण्यात नोंदवले गेले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेतील गंभीर घटनेवर अंतर्गत पातळीवरच निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आणि कितपत आहे ?, म्हणजे संबंधित स्वतः न्यायाधीश झाले का..?असा प्रश्न पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शाळेतील शिस्त राखणे ही निश्चितच प्रशासनाची जबाबदारी आहे ; मात्र एखाद्या विद्यार्थ्याजवळ धारदार शस्त्र आढळणे हा केवळ शिस्तीचा विषय न राहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न बनतो.अशा वेळी घटना दडपण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रिया,पालकांना माहिती, समुपदेशन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.

मुख्याध्यापकांनीच ‘न्यायाधीश’ होणे योग्य आहे का?

शाळेतील किरकोळ शिस्तभंगाच्या घटनांवर प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असते.मात्र शस्त्र आढळल्यासारख्या गंभीर घटनेत संपूर्ण निर्णय स्वतःच घेण्याची भूमिका योग्य आहे का,हा महत्त्वाचा प्रश्न आहे.कायद्याच्या चौकटीत संबंधित यंत्रणांना माहिती देऊन आवश्यक ती कार्यवाही होणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

‘सरस्वती’च्या नावाला काळा डाग लागू नये !

‘सरस्वती’ हे नाव म्हणजे विद्या, ज्ञान, संस्कार आणि सद्विचारांचे प्रतीक मानले जाते.अशा पवित्र नावाने चालणाऱ्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांच्या हातात धारदार शस्त्र पोहोचत असेल, तर ही बाब केवळ एका शाळेची नसून संपूर्ण समाजासाठी आत्मपरीक्षणाची आहे.शाळेची बदनामी होऊ नये म्हणून घटना लपवणे हा उपाय नसून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पारदर्शकपणे उपाययोजना करणे हाच खरा मार्ग आहे.

जनजागृतीचा संदेश

पालकांनी मुलांच्या वर्तनातील बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये अहिंसा, संयम,कायद्याचा आदर आणि परस्पर सन्मान याबाबत सातत्याने जनजागृती करावी. तसेच शाळेच्या परिसरात कोणतेही शस्त्र आढळल्यास त्याकडे केवळ शिस्तीचा विषय म्हणून न पाहता,विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि लागू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.

शाळेची प्रतिष्ठा लपवाछपवीने नव्हे, तर पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेने वाढते.

‘सरस्वती’च्या नावाला काळा डाग लागू नये, यासाठी प्रत्येकाने जागरूक होणे हीच खरी जनजागृती! असल्याचे आणि ते सुद्धा सुदर्शन चक्राप्रमाणे ( म्हणजे दृष्ट शक्तीचा नायनाट करण्याची पूर्ण क्षमता असलेल्या ) सुदर्शन चित्रमंदिर परिसरासह यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या