Tuesday, August 25, 2026
Homeजळगाववेल्हाळे परिसरात बिबट्याची दहशत; वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

वेल्हाळे परिसरात बिबट्याची दहशत; वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

वेल्हाळे परिसरात बिबट्याची दहशत; वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण  भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव ता भुसावळ :
वेल्हाळे गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. ८ रोजी सकाळी शेतात जात असताना एका वाहनावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याच दिवशी सायंकाळीही बिबट्याने पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, नागरिक आता सतर्क झाले आहेत.

वेल्हाळे परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून, या भागात अनेक बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिसरात सुमारे सात ते आठ बिबटे तसेच एका मादी बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीही गावातील नागरिकांना बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

सकाळी आणि सायंकाळी हल्ल्याचा प्रयत्न-
दि. ८ रोजी सकाळच्या सुमारास एक व्यक्ती वाहनावरून शेताकडे जात असताना अचानक बिबट्या समोर आल्याचे सांगण्यात आले. बिबट्याने वाहनावर झडप घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दिवसभर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर सायंकाळीही बिबट्याने पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गावाजवळच अशा प्रकारे बिबट्याचा वावर आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळ शेतात जाणारे शेतकरी, महिला तसेच दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वन विभागाशी संपर्काचा प्रयत्न – –
घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर मुंबई येथील वन विभागाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधण्यात आला. तेथून संबंधित वन अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला; मात्र त्या क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गावाच्या जवळ बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याने वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच परिसरात पिंजरा लावणे, गस्त वाढविणे आणि नागरिकांना आवश्यक सूचना देणे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण —
वेल्हाळे परिसरातील अनेक शेतकरी शेतीच्या कामासाठी पहाटे आणि सायंकाळी शेतात जातात. त्यामुळे बिबट्याचा वावर वाढल्यास शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गावाजवळच बिबट्याचे दर्शन आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांनी एकट्याने शेताकडे जाऊ नये, रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे बाहेर पडू नये आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला चिथावण्याचा प्रयत्न करू नये, अशी दक्षता घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पाहणी करावी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी वेल्हाळे ग्रामस्थांकडून होत आहे. गावाच्या आसपास बिबट्याचा नेमका वावर कुठे आहे, याचा शोध घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या