अमळनेर तहसीलदारांच्या निलंबनाविरोधात महसूल अधिकारी एकवटले; गौण खनिज कारवायांवर बहिष्कार
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गौण खनिज चोरी व अवैध वाहतुकीच्या प्रकरणात अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १२ ऑगस्ट रोजी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना एकवटली आहे. सुराणा यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना अमळनेर येथे पूर्ववत नियुक्त करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महसूल विभागाच्या अपर सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निलंबनाच्या आदेशात अमळनेर तालुक्यातील गौण खनिज चोरी व अवैध वाहतुकीवर प्रभावी कारवाई करण्यात तहसीलदार निष्क्रिय व बेजबाबदार ठरल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी हा आरोप खोडून काढताना सुराणा यांनी गेल्या सहा महिन्यांत तापी व गिरणा नदीपात्रासह विविध ठिकाणी केजलेल्या कारवायांचे पुरावे सादर केले आहेत. या कालावधीत वाहने जप्त करणे, लाखो रुपयांचा दंड वसूल करणे तसेच संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.गौण खनिज चोरी व अवैध वाहतूक रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नसून आरटीओ, पोलीस, स्थानिक प्राधिकरण तसेच ग्राम दक्षता समिती यांचीही संयुक्त जबाबदारी असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.दरम्यान, अवैध गौण खनिजाविरोधात कारवाई करताना महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना शारीरिक हल्ले, मानसिक त्रास आणि धमक्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत आरोपींवर प्रभावी कारवाई किंवा शिक्षा होत नसल्याने महसूल कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधींचा दबाव, विविध तक्रारी आणि कथित खनिज माफियांच्या धमक्यांना सामोरे जात अधिकारी-कर्मचारी काम करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. सुराणा यांच्या निलंबनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे सांगत जळगाव जिल्हा महसूल संघटनेने अवैध गौण खनिजाविरोधातील कारवायांवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सुराणा यांच्यावरील कारवाई एकतर्फी, अवाजवी व अन्यायकारक असल्याचा दावा करत त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, निलंबनाचा आदेश मागे घ्यावा आणि अमळनेर येथे त्यांची पूर्ववत नियुक्ती करावी, अशी मागणी महसूल अधिकारी संघटनेने केली आहे.निवेदनावर जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, बोदवड तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, चाळीसगाव प्रांताधिकारी प्रमोद हिले, भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, एरंडोल प्रांताधिकारी एम. ए. गायकवाड, अमळनेर प्रांताधिकारी मयुर भंगाळे, फैजपूर प्रांताधिकारी बबन काकडे यांच्यासह विविध तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.