भुसावळच्या जुन्या मालधक्क्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; शिर लटकलेल्या अवस्थेत, धड जमिनीवर !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यातील (गुड्स यार्ड) बंद खोलीत अज्ञात व्यक्तीचा सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचे शिर लटकलेल्या अवस्थेत, तर कुजलेले धड जमिनीवर पडलेले आढळून आले.
दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी रेल्वे प्रशासनाशी संबंधित कामासाठी जुन्या मालगोदामातील खोली उघडण्यात आली. सायंकाळी सुमारे ४ वाजता गोदामाचे दार उघडताच परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवली. दुसरे दार उघडल्यानंतर लटकलेल्या अवस्थेतील शिर आणि खाली पडलेले कुजलेले धड दिसून आले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपी आणि बाजारपेठ पोलिसांना कळविण्यात आले.
मृतदेहावरील काही कपडे शिल्लक असले तरी शरीराची मोठ्या प्रमाणात कुजलेली अवस्था असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. मृत्यू आत्महत्या, खून किंवा अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत सध्या निश्चित माहिती समोर आलेली नाही.घटनास्थळ रेल्वे प्रशासनाच्या जुन्या कार्यालयीन जागेत असून तेथे भंगार साहित्य ठेवले जात असल्याची माहिती आहे. बंद असलेल्या खोलीत अज्ञात व्यक्ती कशी पोहोचली, खोलीचे कुलूप कसे उघडले गेले आणि एवढ्या दिवसांपासून मृतदेहाची माहिती प्रशासनाला कशी मिळाली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, घटना नेमकी कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, यावर घटनास्थळी काही काळ चर्चा झाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर सदर परिसर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास बाजारपेठ पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.घटनास्थळी आरपीएफ, जीआरपी आणि बाजारपेठ पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मृत व्यक्तीची ओळख पटविणे, मृत्यूचे नेमके कारण शोधणे तसेच या घटनेमागील परिस्थितीचा उलगडा करणे, हे पोलिसांसमोरचे प्रमुख आव्हान आहे.
या घटनेमुळे भुसावळ रेल्वे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके गूढ उकलण्याची शक्यता आहे.

