वन विभाग,नगरपालिका, महसूल यांच्या नाकावर टिचून जिवंत व जुन्या झाडांची सर्रास कत्तल.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी – नगरसेविका वर्षा चोपडे
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१८
नगरपरिषद,महसूल व वन , विभाग यांच्या नाकावर टिचून तसेच नागरिकांची दिशाभूल फसवणूक करीत शहरातील गंगानगर गार्डनमध्ये तसेच गार्डनच्या शेजारील परिसरातील प्राचीन,अनेक वर्ष जुनी जिवंत मोठी,जाड,उंच व जिवंत झाडे एका अज्ञातने कत्तल करून अवैध वाहतूक केल्याची गंभीर बाब समोर आली असून,या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गटाच्या) नगरसेविका तथा गटनेत्या वर्षा आकाश चोपडे,भाजप नगरसेविका सौ.कल्पना दिलीप वाणी यांनी केली आहे.
नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,गंगानगर गार्डनमध्ये व गार्डनच्या शेजारील परिसरात अंदाजे ५ ते ७ मोठी व पूर्णपणे जिवंत झाडे तोडून नेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर झाडे मोठ्या आकाराची व अनेक वर्षे जुनी असल्याने त्यांचे पर्यावरणीय महत्त्व मोठे होते.या झाडांमुळे नागरिकांना सावली मिळत होती तसेच शहराच्या हरित क्षेत्रातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
“शहरातील जुनी व जिवंत झाडे ही केवळ मालमत्ता नसून नागरिकांची आणि पर्यावरणाची संपत्ती आहे.कोणालाही बेकायदा पद्धतीने अशी झाडे तोडून नेण्याचा अधिकार नाही. महसूल विभाग वन विभाग, नगरपरिषद यांच्याकडून आवश्यक परवानगी न घेता झाडे तोडण्यात आली असतील तर संबंधितांची कोणतीही हयगय न करता कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका नगरसेविका वर्षा चोपडे यांनी मांडली.
सदर झाडे तोडण्यासाठी संबंधित व्यक्तीने न.पा.किंवा सक्षम
प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली होती का.? याची तपासणी करण्यात यावी. परवानगी घेतली असल्यास त्या अटी,शर्तीचे पालन वृक्षतोड करणाऱ्यांने केले आले आहे किंवा नाही.? याचीही चौकशी करण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच घटनास्थळी तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा, तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या,प्रकार,आकार व अंदाजे वय यांची नोंद करावी आणि परवानगी नसल्यास बेकायला वृक्षतोड करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
तोडलेल्या झाडांचे लाकूड कुठे नेण्यात आले,त्याचा वापर अथवा विक्री कुठे कोणी केली ? याबाबत त्या परिसरातील नागरिकांचे जाब- जबाब घेऊन, पंचनामा करून वृक्षतोड कोणी केली हे समोर येईल.तरी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,अशी मागणी नगरसेविका वर्षा आकाश चोपडे,सौ.कल्पना वाणी यांनी केली आहे.
यावल शहरातील पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी अशी सुद्धा तक्रारदार नगरपरिषद सदस्यांनी म्हटले आहे.

