पारोळ्यात ग्रामसेवकाच्या मारहाणीत मृत्यू; सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ; एकाला अटक !
पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जुने बिल काढण्याच्या वादातून ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील शिवरे येथे सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) घडली. प्रल्हाद पाटील (वय ५२) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे.
शिवरे येथे सोमवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्याशी जुन्या बिलांच्या कारणावरून काही ग्रामस्थांचा वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सात जणांच्या गटाने पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे समोर आले आहे.मारहाणीनंतर जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच प्रल्हाद पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान, मृत ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) त्यांच्या मूळ गावी बोधर्दे, ता. पारोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामसेवकाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.