Wednesday, August 19, 2026
Homeजळगावअट्रावलच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; इंजाळ नदीपात्रात वड्री धरणाचे पाणी सोडले : शेतकरी...

अट्रावलच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; इंजाळ नदीपात्रात वड्री धरणाचे पाणी सोडले : शेतकरी आनंदी

अट्रावलच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; इंजाळ नदीपात्रात वड्री धरणाचे पाणी सोडले : शेतकरी आनंदी

फैजपूर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         अट्रावल, दि. १९ ऑगस्ट २०२६ : गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या अट्रावल गावातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रातून अट्रावलपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सुरू असलेले पाईपलाईनचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात आले असून इंजाळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. आमदार अमोल दादा जावळे यांच्या चौकस दृष्टीचा परिसराला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

कठोरा, सांगवी, अट्रावल व सांगवी खुर्द या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींची जलपातळी वाढविण्याच्या मागणीचा विचार करून आमदार अमोलदादा जावळे यांनी आमदार निधीतून अंदाजे ३५ लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

Oplus_131072

या निधीतून वड्री धरण ते कठोरा शिवारातील इंजाळ नदीपात्रादरम्यान पूर्वी अपूर्ण राहिलेले पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी ३६ इंच व्यासाचे NT-4 प्रकारचे पाईप टाकून त्यांची फिटिंग करण्यात आली. पाईपलाईनच्या कामानंतर कठोरा येथील ग्रामस्थांनी काही किरकोळ कामे श्रमदानातून पूर्ण केली.

यानंतर इंजाळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, येत्या ८ ते १० दिवसांत हे पाणी अट्रावलपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अट्रावल गावाच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या विहिरीची जलपातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच अट्रावल शिवारातील शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या सुमारे बारा वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या अट्रावल ग्रामस्थांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी गावापर्यंत पोहोचल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कठोरा, सांगवी, अट्रावल व सांगवी खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी आमदार श्री. अमोलदादा जावळे यांचे मनापासून आभार व्यक्त केले असून, त्यांच्या सहकार्याबद्दल शतशः कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रातून अट्रावलपर्यंत पोहोचल्याने गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या