Friday, August 21, 2026
Homeजळगावतालुक्यात घरकुल बांधकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष ?

तालुक्यात घरकुल बांधकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष ?

तालुक्यात घरकुल बांधकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष ?

यावल दि.२१ ( सुरेश पाटील) तालुक्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ठिकाणी घरकुलांचे बांधकाम अनियमित व निकृष्ट प्रतीचे होत असल्याच्या तक्रारी असून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पंचायत समितीच्या प्रशासनाचे याकडे पुरेसे लक्ष नसल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.
घरकुल योजनेचा मुख्य उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, गुणवत्तेची तपासणी आणि वेळोवेळी पाहणी होत आहे किंवा नाही, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सीईओंच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष
यावल तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतंत्रपणे तपासणी केल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या चौकशीत बांधकामाच्या गुणवत्तेसोबतच संबंधित यंत्रणेकडून दिरंगाई, दुर्लक्ष किंवा अनियमितता झाली आहे किंवा नाही, याचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.
विशेषतः ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे वेळेत निरसन करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असताना, तक्रारींकडे दुर्लक्ष झाले असल्यास त्याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
एका ग्रामपंचायत हद्दीत ५० ते १०० घरकुलांचा प्रश्न
तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे ५० ते १०० घरकुलांचे काम सुरू असल्याची माहिती असून, संबंधित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने घरकुल लाभार्थी आणि काम करणाऱ्या ठेकेदारामध्ये वाद निर्माण झाल्याचे समजते. काही ठिकाणी या वादाला चांगलेच उग्र स्वरूप आल्याची चर्चा आहे.
घरकुल लाभार्थ्यांकडून काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत असताना संबंधित ग्रामसेवक तसेच यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या तक्रारींवर अपेक्षित ती कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
तक्रारींची चौकशी होणार का?
घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर होऊन दर्जेदार बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे बांधकामाची गुणवत्ता, लाभार्थ्यांना मिळणारे तांत्रिक मार्गदर्शन, निधीचा वापर, कामाची प्रगती आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येणारी पाहणी या सर्व बाबींची तपासणी होणे गरजेचे आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतरही त्या प्रलंबित राहिल्या असतील, तर त्यामागील कारणांची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाणार का? तक्रारींचे निरसन करण्यात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का? याकडे आता यावल तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि पात्र घरकुल लाभार्थ्यांची बांधकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून द्यावीत, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.
चौकशीअंतीच सत्य समोर येणार
घरकुल बांधकामांबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच त्यातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून यावल तालुक्यातील घरकुल बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी होते का आणि दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या