आठ प्रमुख स्थानकांवर धडक तपासणी; ३२३ प्रकरणांत कारवाई, ट्रेसपासिंगच्या सहा प्रकरणांवरही दंड
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी भुसावळ रेल्वे विभागातर्फे बुधवारी (दि. २६) ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम’ राबविण्यात आली. भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या आठ प्रमुख स्थानकांवर एकाचवेळी धडक तपासणी करण्यात आली.या विशेष मोहिमेत ५४ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे सहा कर्मचारी सहभागी झाले. दिवसभराच्या कारवाईत विनातिकीट व अनधिकृत प्रवासाची एकूण ३२३ प्रकरणे नोंदविण्यात आली. या कारवाईतून तब्बल २ लाख ४६ हजार ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अस्वच्छता करणाऱ्यांवरही कारवाई
रेल्वे परिसरात अस्वच्छता व घाण पसरविणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४५(ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली. अशा पाच प्रकरणांतून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच रेल्वे रुळांवर अथवा रेल्वेच्या मालमत्तेवर अनधिकृत प्रवेश करणाऱ्या व्यक्तींविरोधात कलम १४७ अंतर्गत सहा प्रकरणे दाखल करण्यात आली. या प्रकरणांतून ३ हजार १० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
‘तिकीट असेल तरच प्रवास करा’ विनातिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत बुकिंग काउंटर, एटीव्हीएम, अधिकृत तिकीट विक्रेते किंवा आयआरसीटीसीच्या माध्यमातून वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे विभागाने केले आहे.मोबाईलवरील ‘RailOne’ अॅपद्वारेही तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध प्रवासासाठी सहकार्य करावे, असे विभागाने स्पष्ट केले.