एका महिन्यात ५० जणांना कुत्र्यांचा चावा ; कायम स्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वरणगाव शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, गेल्या महिनाभरात तब्बल ५० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची खळबळजनक माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, बुधवारी एकाच दिवसात सात नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना वरणगाव येथे घडली असून, यात वृद्धांसह लहान मुलांचाही समावेश आहे.
वरणगाव शहरासह तळवेल, ओझरखेडा, वरणगाव फॅक्टरी, निंभोरा, अंजनसोंडे, फुलगाव आदी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नगरपरिषदेची कुत्रे पकडण्याची मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने शहरातील गल्लीबोळ, मुख्य रस्ते, बाजार परिसर तसेच भोगावती नदी परिसरात मोठ्या संख्येने कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत. या कुत्र्यांकडून नागरिकांवर वारंवार हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दिवसा तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाची माहिती मिळताच नगराध्यक्ष सुनील काळे यांनी संबंधित कुत्रे पकडणाऱ्या पथकाला तातडीने पाचारण करून शहरात कुत्रे पकडण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात केली. रामपेठ भागात पाच ते सहा कुत्रे पकडण्यात आले असून नगराध्यक्ष सुनिल काळे , नगरसेविका श्रद्धा गायकवाड , माजी नगरसेवक गणेश धनगर यांनी कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमी महिलेची भेट घेतली.कुत्रे पकडण्याची मोहीम सातत्याने राबवून कायम भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकाच दिवसात नागरिकांवर हल्ले
एकाच दिवसात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये चमेलीबाई झोपे (५८, तळवेल), संगीता निंबाळकर (५६), विजय तायडे (३५, ओझरखेडा), विजया भोई वय ४५ वरणगांव , मोहिनी कोळी (१४, वरणगाव), महेश निंबा धनगर (१३, ओझरखेडा), सुबीला अरमान बेग (२४, वरणगाव) आणि पप्पू जकातदार (४०, वरणगाव) यांचा समावेश आहे.भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नगरपरिषदेने नियमितपणे कुत्रे पकडण्याची मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.दरम्यान नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी इतर गावाहून आणलेले कुत्रे वरणगाव येथे सोडले गेल्याने ही संख्या वाढली असून वरणगाव येथील आठवडे बाजारात मांस विक्री करणाऱ्यांनी उर्वरित मांस योग्य ठिकाणी टाकावे असेही आवाहन केले आहे .

