Thursday, August 27, 2026
Homeभुसावळविजेचा धक्का लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू ; भुसावळ येथील घटना!

विजेचा धक्का लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू ; भुसावळ येथील घटना!

विजेचा धक्का लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू ; भुसावळ येथील घटना!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील गांधीपुतळा चौक परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने बिघाड तपासण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास डी.एस. कॉम्प्लेक्स परिसरात घडली.

अजय निवृत्ती चौधरी (वय २६, रा. मैनाबाई नगर, रिंगरोड, भुसावळ) यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, ते महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत त्यांची ड्युटी होती. यावेळी ते सहकारी दीपक लिधुरे व वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५, रा. गौरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ) यांच्यासह डी.एस. ग्राउंड कक्षाच्या परिसरात पेट्रोलिंग करीत होते.दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची ग्राहक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिघेही गांधीपुतळा चौकातील पेट्रोलपंपासमोर असलेल्या डी.एस. कॉम्प्लेक्सजवळील ११ केव्ही कटपॉईंट खांबावरील फॉल्ट तपासण्यासाठी गेले. वैभव दांडेकर हे कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांनी वर गेले. त्यांच्या मागोमाग अजय चौधरी वर जात असताना अचानक वैभव यांना विजेचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले.
घटनेनंतर सहकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. महावितरणचे सहायक अभियंता अजय गावंडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमी वैभव दांडेकर यांना तातडीने ट्रामा केअर सेंटर, भुसावळ येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या