Wednesday, September 2, 2026
Homeजळगावराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथे २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहपूर्ण आणि क्रीडामय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. नंदेश्वर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डी. एस. नंदेश्वर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याबरोबरच खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावना यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानिमित्त इयत्ता चौथी चा विद्यार्थी संकल्प सिंग आणि इयत्ता अकरावी ‘ची विद्यार्थिनी तथा क्रीडा उपमुख्य विद्यार्थी प्रतिनिधी यशश्री पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यालयात पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० मीटर धावणे, दोरीवरच्या उड्या आणि खो-खो यांसारख्या मैदानी खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘पास पास’ हा खेळ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.

दिवसभर विविध क्रीडा स्पर्धांमुळे विद्यालय परिसर उत्साहाने फुलून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक मच्छिंद्र पाटील, योग शिक्षिका मयुरी बलेल, प्राथमिक शिक्षक संदीप पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंसह सहभागी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या