तहसीलदारांच्या वाहनाला अपघात; चालक जखमी !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तहसीलदारांचे शासकीय वाहन जळगावहून चाळीसगावकडे येत असताना पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाजवळ रविवारी (दि. ६) दुपारी अपघात झाला. वाहनाच्या स्टेअरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताच्या वेळी वाहनात चालक जावेद शेख हे एकटेच होते. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने श्रीराम केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभ यांनी तत्काळ पाचोरा येथे धाव घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी चालकाची भेट घेतली तसेच त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली.या अपघातात शासकीय वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

