Saturday, October 24, 2026
Homeजळगावश्रीनागेश्वर महादेव मंदिर ते सिद्धेश्वरनगर रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद; महिला, मुलांच्या...

श्रीनागेश्वर महादेव मंदिर ते सिद्धेश्वरनगर रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद; महिला, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

वरणगावात पथदिव्यांचा अंधार; नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष !

श्रीनागेश्वर महादेव मंदिर ते सिद्धेश्वरनगर रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्यांपासून बंद; महिला, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क –
वरणगाव–बोदवड रोडवरील श्रीनागेश्वर महादेव मंदिर ते सिद्धेश्वरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषद प्रशासनाला या समस्येकडे लक्ष देण्यासाठी आणखी किती काळ लागणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या मार्गावर अनेक नागरिक रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी जातात. महिला, मुली आणि लहान मुलांचीही या रस्त्यावर वर्दळ असते. मात्र, पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच महिला व मुलींच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे, नवीन पथदिवे बसविणे शक्य नसेल, तरी सध्या अस्तित्वात असलेले आणि दुरुस्ती करून सुरू करता येणारे पथदिवे सुरू करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून प्रयत्न का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पथदिवे सुरू करण्यामागे नेमकी अडचण काय आहे? अधिकाऱ्यांची उदासीनता आहे की नगरपरिषदेच्या तिजोरीवर आर्थिक भार पडण्याची भीती आहे, असा सवालही नागरिक करत आहेत.

करदात्या नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष का?

नगरपरिषदेला नागरिकांकडून विविध करांच्या माध्यमातून महसूल मिळतो. त्या बदल्यात नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिक कर भरतात, ही बाब प्रशासनाने विसरता कामा नये. दोन महिन्यांपासून पथदिवे बंद असतानाही समस्या कायम राहणे ही बाब चिंताजनक आहे.

श्रीनागेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, तसेच संपूर्ण मार्गावरील प्रकाशव्यवस्थेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता नगरपरिषद प्रशासन या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करते की नागरिकांना अंधारातच मार्गक्रमण करावे लागते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या