भुसावळ न्यायालयाचा निकाल ! पत्नीला काचेची बाटली मारल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिषिधी – पत्नीच्या गालावर काचेची बाटली मारून जखमी केल्यासह शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून पतीची भुसावळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अभियोग पक्षाला आरोपीविरुद्धचा गुन्हा न्यायालयात सिद्ध करता न आल्याने हा निकाल देण्यात आला.
वरणगाव येथील रहिवासी चंदना दिपक तायडे आणि त्यांचे पती दिपक तुळशीराम तायडे यांच्यात वैवाहिक वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर १२ जानेवारी २०१८ रोजी भुसावळ न्यायालयाच्या गेट क्रमांक एकजवळ पती दिपक तायडे (वय ६२) यांनी काचेची बाटली गालावर मारून जखमी केले, तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पत्नी चंदना यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करून दिपक तायडे यांच्याविरुद्ध भुसावळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियोग पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. मात्र, सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात अभियोग पक्षाला यश आले नाही. त्यामुळे न्यायालयाने दिपक तायडे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात आरोपी दिपक तायडे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन खरे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

