Wednesday, September 9, 2026
Homeजळगावशेळगाव बॅरेज पुलावर ‘सोयीनुसार’ वाहतुकीचा आरोप!

शेळगाव बॅरेज पुलावर ‘सोयीनुसार’ वाहतुकीचा आरोप!

शेळगाव बॅरेज पुलावर ‘सोयीनुसार’ वाहतुकीचा आरोप!

सर्वसामान्यांना बंदी, मग मालवाहतूक वाहनांना मुभा कशी?; सीसीटीव्ही यंत्रणेच्या उपयोगितेवरही सवाल

यावल,     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि. ९ सप्टेंबर २०२६ यावल-भुसावळ परिसरातील शेळगाव बॅरेज पुलावरून वाहतुकीबाबत सुरू असलेल्या कथित विसंगतींमुळे आता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, गरजू आणि कधीतरी या मार्गाने ये-जा करणाऱ्यांसाठी निर्बंध असल्याचे चित्र असताना काही मालवाहतूक वाहने मात्र पुलावरून ये-जा करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

विशेष म्हणजे, मालवाहतूक वाहनांच्या माध्यमातून कथितरीत्या सुरू असलेल्या या ये-जा प्रकाराकडे मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २चे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे नेमके कशासाठी?

शेळगाव बॅरेज परिसरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी करण्यात आलेला खर्च, त्यांची कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष देखरेख याबाबतही आता नागरिकांकडून प्रश्न विचारले जात आहेत.

सीसीटीव्ही सुरू असताना पुलावरून कोणते वाहन कधी येते-जाते, याची नोंद होत असेल तर निर्बंध असतानाही काही वाहनांना प्रवेश कसा मिळतो? तसेच काही लहान सहा चाकी वाहनांमधून वाळू, माती किंवा इतर संशयास्पद मालाची वाहतूक होत असल्याची चर्चा असल्यास त्याची तपासणी होते का, याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.

‘सर्वांसाठी बंदी’ की ‘काहींसाठी मुभा’?

शेळगाव बॅरेज पुलावरून सर्वसामान्यांची वाहतूक रोखली जात असल्यास, दैनंदिन स्वरूपात या मार्गावरून ये-जा करणाऱ्या मालवाहतूक वाहनांबाबत नेमका नियम काय आहे? असा थेट प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

जर अशा वाहनांना अधिकृत परवानगी असेल तर ती कोणत्या आदेशानुसार, कोणत्या अटींवर आणि कोणत्या कालावधीसाठी देण्यात आली आहे, हे सार्वजनिक करावे. आणि जर परवानगी नसेल, तर संबंधित वाहनांवर कारवाई का होत नाही, याचे उत्तरही विभागाने द्यावे.

‘दोन नंबर’च्या वाहतुकीच्या चर्चेने प्रशासनाची जबाबदारी वाढली

शेळगाव बॅरेज पुलावरून वाळू, माती अथवा इतर अवैध वस्तूंची वाहतूक होत असल्याच्या चर्चाही परिसरात आहेत. मात्र या बाबींची अधिकृत पुष्टी संबंधित यंत्रणेकडून झालेली नाही. त्यामुळे मध्यम प्रकल्प विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुलासा करावा

शेळगाव बॅरेज पुलावरील वाहतुकीचे नियम नेमके काय आहेत? सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का? त्यांचे फुटेज नियमित तपासले जाते का? कोणत्या प्रकारच्या वाहनांना प्रवेशाची परवानगी आहे? निर्बंध असतानाही वाहनांची ये-जा होत असल्यास त्यावर काय कारवाई करण्यात आली?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेसमोर स्पष्ट करावीत, अशी मागणी यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

‘नियम सर्वांसाठी समान आहेत की काहींसाठी वेगळे?’ या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासन देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या