भुसावळ पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; ७५८ समाजकंटकांवर कायद्याचा बडगा !
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिबंधक कारवाई; २ गुन्हेगार स्थानबद्ध, २६ जण तडीपार; ६२६ चाप्टर केसेस दाखल !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – आगामी सण-उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावेत, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सन २०२६ मध्ये आतापर्यंत भुसावळ उपविभागात तब्बल ७५८ समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सराईत गुन्हेगार, उपद्रवी व्यक्ती तसेच शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
दोन गुन्हेगार स्थानबद्ध
या विशेष मोहिमेत एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत २६ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच कलम ५५ अंतर्गत टोळी तडीपारीची एक कारवाई करण्यात आली.संशयास्पद हालचाली करणाऱ्या तसेच संशयित मुद्देमाल बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत १४, तर कलम १२४ अंतर्गत एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
६२६ जणांविरुद्ध चाप्टर केसेस
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर चाप्टर केसेस दाखल केल्या आहेत. कलम ११० CrPC अंतर्गत सराईत गुन्हेगारांविरुद्ध ५४ प्रकरणे, तर कलम १०७ CrPC अंतर्गत तब्बल ६२६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. याशिवाय कलम १०९ CrPC अंतर्गत संशयित व्यक्तींविरुद्ध १४ प्रकरणे दाखल करण्यात आली.अवैध दारू व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनाही पोलिसांनी लक्ष्य केले असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत २० इसमांविरुद्ध चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्राची कारवाई करण्यात आली आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची करडी नजर
आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता भंग करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या अथवा सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भुसावळ पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी सण-उत्सव शांततेत, सलोख्याने आणि उत्साहात साजरे करावेत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

