भुसावळ-वरणगावात आज गणरायाची स्थापना !
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहर दुमदुमणार; सार्वजनिक मंडळांसह घराघरांत उत्साहाची लाट
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ-वरणगाव :
गणेशोत्सवाचा मंगलमय प्रारंभ आज होत असून, भुसावळ आणि वरणगाव शहरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मंडप, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
भुसावळातील जामनेर रोडसह प्रमुख बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली आहे. कुटुंबीयांसह नागरिकांनी पसंतीच्या मूर्तीची निवड करून बुकिंग केली असून, आज घराघरांत बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
१७२ मंडळांत बाप्पा विराजमान होणार – –
भुसावळ शहरात यंदा १७२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्रींची स्थापना केली जाणार आहे. मंडळांकडून आकर्षक मंडप आणि सजावटीची तयारी करण्यात आली असून, अनेक ठिकाणी सामाजिक व धार्मिक उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. काही मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देत शाडूमातीच्या गणेशमूर्तींना पसंती दिली आहे.
वरणगावातही १०३ मंडळांची तयारी – –
वरणगाव शहरातही गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून, सुमारे १०३सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आज गणरायाची स्थापना होणार आहे. मुख्य रस्त्यालगत गणेशमूर्तींचे स्टॉल्स सजले असून, सकाळपासूनच मूर्ती नेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत – –
आज दिवसभर शहरातील विविध भागांत गणेशमूर्तींची मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया!’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय होणार आहे. सार्वजनिक मंडळांसह घराघरांतही विधिवत पूजाविधी करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याने भुसावळ-वरणगाव शहर आज गणेशमय होणार आहे.

