Friday, September 18, 2026
Homeगुन्हागोशाळा, सरकारी नोकरी व दुप्पट नफ्याचे आमिष; व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा !

गोशाळा, सरकारी नोकरी व दुप्पट नफ्याचे आमिष; व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा !

गोशाळा, सरकारी नोकरी व दुप्पट नफ्याचे आमिष; व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गोशाळेसाठी जमीन, शासकीय नोकरी आणि पालिकेच्या ठेकेदारीत दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फुल व्यावसायिकाची तब्बल २४ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाचोरा शहरात उघडकीस आला आहे. यात ११ लाख ८३ हजार रुपये रोख व ऑनलाइन माध्यमातून घेतल्याचा, तर १२ लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा कार नेल्याचा आरोप आहे.

बिल्दी बुद्रुक येथील श्याम श्रीराम जाधव (३२) यांनी याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या काही वर्षांपासून फुल विक्रीचा व्यवसाय करतात. याच परिसरात कपड्याचे दुकान असलेल्या जितेंद्र महारू अहिरे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले.फिर्यादीनुसार, अहिरे याने गोशाळा सुरू करण्यासाठी जमीन आवश्यक असल्याचे सांगून जाधव यांची बिल्दी येथील जमीन पसंत केली. गोशाळेला शासकीय मान्यता मिळवून देण्याबरोबरच तेथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.यानंतर अहिरे याने त्याचा मामेभाऊ राजीव शिवाजी वाघ हा चाळीसगाव पालिकेत असून ठेकेदारीचे काम करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. २० लाख रुपये दिल्यास दुप्पट रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप आहे.या आमिषाला बळी पडून जाधव यांनी २३ जानेवारी २०२३ पासून वेळोवेळी रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण ११ लाख ८३ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी नातेवाईकाच्या लग्नाला जायचे असल्याचे सांगून अहिरे याने १२ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कारही नेल्याचा आरोप आहे.

पैसे आणि कार परत मागूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जाधव यांनी १७ सप्टेंबर रोजी पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या