Friday, September 18, 2026
Homeजळगावविद्यार्थ्यांच्या हस्ते साकारलेल्या शाडूमातीच्या गणरायाला भावपूर्ण निरोप.

विद्यार्थ्यांच्या हस्ते साकारलेल्या शाडूमातीच्या गणरायाला भावपूर्ण निरोप.

विद्यार्थ्यांच्या हस्ते साकारलेल्या शाडूमातीच्या गणरायाला भावपूर्ण निरोप.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलचा संस्कार,अध्यात्म आणि पर्यावरणाचा अनोखा संगम.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि. १८   — गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे,तर बुद्धी,विवेक,संस्कार आणि सकारात्मक विचारांची उपासना करणारा आध्यात्मिक सोहळा आहे.याच भावनेतून येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यंदाचा गणेशोत्सव विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरणपूरक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शाडूमातीच्या श्री गणेश प्रतिकृतीचे आज दि. १८ रोजी मोठ्या उत्साहात वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले.
शाळेतील इयत्ता पाचवी,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून श्री गणेशाची प्रतिकृती तयार करून तिची विधिवत स्थापना केली होती.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘स्वतःच्या हाताने निर्माण करणे, निसर्गाचा आदर करणे आणि भक्तीभावाने उत्सव साजरा करणे’ या मूल्यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.शाळेच्या सहशिक्षिका श्रद्धा बडगुजर यांनी शाडूमातीची पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती तयार केली. शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन व दिपाली धांडे यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात गणरायाची स्थापना करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून भक्तिमय वातावरण निर्माण केले.
अथर्वशीर्ष पठणातून आध्यात्मिक संस्कार
आध्यात्मिक परंपरेत श्रीगणेशाला बुद्धी,विवेक,ज्ञान आणि विघ्नहर्ता म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. अथर्वशीर्ष पठणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक परंपरेची ओळख झाली नाही, तर एकाग्रता, शिस्त, सामूहिकता आणि सकारात्मक विचार यांसारख्या मूल्यांचाही अनुभव मिळाला.त्यामुळे शाळेतील गणेशोत्सव हा मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम जडणघडणीचा उपक्रम ठरला. मातीच्या गणरायातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी तयार केलेली शाडूमातीची मूर्ती हा या गणेशोत्सवाचा विशेष आकर्षणाचा विषय ठरला.

पारंपरिक भक्तीभाव कायम ठेवत पर्यावरणाचे भान जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘भक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड’ घालण्याचा शाळेचा प्रयत्न लक्षवेधी ठरला.

गणेशोत्सवाची संपूर्ण तयारी शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आज गणेश विसर्जनाच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.भक्तिमय वातावरणात गणरायाची आरती व जयघोष करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवृंदांनी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

विद्यार्थ्यांच्या हातून गणरायाची निर्मिती,अथर्वशीर्ष पठणातून अध्यात्मिक संस्कार आणि शाडूमातीच्या मूर्तीमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलचा हा गणेशोत्सव आगळावेगळा ठरला. उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार,सामाजिक जबाबदारी आणि निसर्गप्रेम रुजविण्याचा हा उपक्रम पालक व नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या