Monday, September 21, 2026
Homeजळगावसुनसगाव-गोंभीतील महिला प्रशिक्षणाचा ‘हिशेब’ कुठे ?

सुनसगाव-गोंभीतील महिला प्रशिक्षणाचा ‘हिशेब’ कुठे ?

सुनसगाव-गोंभीतील महिला प्रशिक्षणाचा ‘हिशेब’ कुठे ?

प्रशिक्षण संपले, मात्र साहित्य-प्रमाणपत्रांचा पत्ता नाही; ग्रामपंचायतीने दिलेल्या धनादेशावरून सवाल

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्यूज  प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव व गोंभी येथील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. प्रशिक्षण पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला, तरी प्रशिक्षणार्थी महिलांच्या हातात ना साहित्य आले ना प्रमाणपत्र! त्यामुळे प्रशिक्षणासाठी मंजूर झालेल्या निधीचा नेमका वापर कसा झाला, असा सवाल ग्रामविकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

सुनसगाव येथे शिवणकाम, तर गोंभी येथे ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ येथील ‘राही’ संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही संबंधित महिलांना साहित्य व प्रमाणपत्र मिळाले नसल्याची तक्रार पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित संस्थेला ग्रामपंचायतीकडून प्रशिक्षणासाठी धनादेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे धनादेश कोणत्या ठरावाच्या आधारे देण्यात आला? संबंधित संस्थेची निवड कशी झाली? प्रशिक्षणासाठी किती निधी मंजूर झाला? किती महिलांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले? एका प्रशिक्षणार्थीमागे किती खर्च करण्यात आला? साहित्याची खरेदी झाली असल्यास ते कुठे आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याप्रकरणी ग्रामविकास युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. त्यावेळी लवकरच साहित्य व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मात्र प्रशिक्षण संपल्यानंतर साहित्य वाटप करण्याची वेळ का आली? प्रशिक्षणादरम्यानच साहित्य उपलब्ध करून दिले असते, तर महिलांना त्याचा प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी उपयोग झाला असता. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची कागदोपत्री व प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

ग्रामपंचायतीकडून संबंधित संस्थेला देण्यात आलेल्या धनादेशापासून ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रत्यक्ष मिळालेल्या सुविधांपर्यंत संपूर्ण खर्चाचा हिशेब सार्वजनिक करावा, अशी मागणी ग्रामविकास युवा मंचाने केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची योग्य ती चौकशी न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशिक्षण संस्थेकडून या प्रश्नांवर नेमके काय उत्तर दिले जाते, याकडे सुनसगाव व गोंभी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या