भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीच्या आगीत ‘१०८’ रुग्णवाहिकेची ढाल; चालक मनोज भोईटे व डॉ. इरफान खान यांच्या तत्परतेचे भुसावळ परिसरात कौतुक.


यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२२
भुसावळ येथील एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका केमिकल फॅक्टरीमध्ये अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली.आगीचे स्वरूप आणि केमिकलचा धोका लक्षात घेता मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून यावल येथील व जळगाव जिल्ह्यातील ‘१०८’ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने (सुमीत एसएसजी) दाखवलेली तत्परता आणि यावलसह परिसरातील रुग्णवाहिकांच्या वेळेवर झालेल्या तैनातीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.

केमिकल फॅक्टरीतील आगीची माहिती मिळताच १०८ आपत्कालीन सेवेची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचवणे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचवणे या उद्देशाने १०८ ची टीम घटनास्थळी अहोरात्र सज्ज राहिली.
चालक मनोज भोईटे व डॉ. इरफान खान यांचे कौतुक
या अत्यंत कठीण आणि धोक्याच्या परिस्थितीत १०८ रुग्णवाहिकेचे चालक मनोज भोईटे आणि डॉ.इरफान खान यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यंत सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा दाखवून सेवा बजावली. आगीच्या ठिकाणी धुराचे लोट आणि रसायनांचा धोका असतानाही त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे व वेळेवर दिलेल्या वैद्यकीय साहाय्यामुळे सर्वांनीच या टीमचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलवर धावून जाणे, रुग्णांना सुरक्षित ठेवणे आणि वेळेत वैद्यकीय मदत देऊन जीव वाचवणे हीच १०८ सेवेची खरी ओळख आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील १०८ च्या या तत्पर सेवेचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

