महामार्गावर मृत्यूचा थरार! मोपेडला ट्रकची जोरदार धडक; दोघांचा दुर्दैवी अंत


. भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. दीपनगर उड्डाणपुलाजवळ वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या TVS मोपेडला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोपेड ट्रकमध्ये अडकून दीपनगर उड्डाणपुलापासून शेरे पंजाब हॉटेलजवळपर्यंत फरफटत गेल्याची धक्कादायक माहिती आहे. या दुर्घटनेत देवेन चौधरी आणि सलीम मिर्जा बेग या दोघांचा मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजता हा अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही तरुण वरणगाव येथे रेल्वेत काम करतातTVS मोपेडवरून वरणगावहून भुसावळकडे येत होते. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की मोपेड ट्रकच्या पुढील भागात अडकली आणि ट्रक काही अंतर पुढे गेल्याने मोपेड रस्त्यावरून फरफटत गेली.
या दुर्घटनेत देवेन चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून, गंभीर जखमी झालेल्या सलीम मिर्जा बेग यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघाताची तीव्रता पाहता घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आरटीओ कर्मचाऱ्यांची तत्परता; मदतकार्याला वेग
योगायोगाने त्याच वेळी या मार्गावरून आरटीओ विभागातील पोलिस कर्मचारी जात होते. त्यांच्या निदर्शनास अपघाताची घटना येताच त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सलीम मिर्जा बेग यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
अपघातानंतर चालक पुढे निघाला; नशिराबाद टोलनाक्यावर पकडल्याची माहिती
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता वाहन पुढे घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, संबंधित ट्रक व चालकाला नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर . घरातून नेहमीप्रमाणे बाहेर पडलेले दोन तरुण पुन्हा घरी परतले नाहीत, ही बाब त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरली आहे. काही क्षणांच्या या अपघाताने दोन कुटुंबांचा आधार हिरावला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यातील मिर्झा हा ठेकेदारीत काम करत होते तर देवेन पर्मनंट रेल्वेत कार्यरत होता . दोन्ही भुसावळ चे रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे .
या अपघातामागील नेमके कारण, ट्रकचा वेग आणि चालकाची भूमिका याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, वाहनांचा वेग आणि सुरक्षित अंतराचा अभाव यामुळे अपघातांचा धोका कायम असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. नियमांचे पालन आणि सावध वाहनचालक हीच अशा दुर्घटना टाळण्याची खरी गरज आहे. देवेन चौधरी आणि सलीम मिर्जा बेग या दोन तरुणांचा अकाली मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांसाठी कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करणारा ठरला आहे.

