Thursday, September 24, 2026
Homeजळगावभुसावळात सोनार भगिनींची पर्यावरणपूरक किमया; गाईच्या शेणापासून साकारली आकर्षक गणेशमूर्ती

भुसावळात सोनार भगिनींची पर्यावरणपूरक किमया; गाईच्या शेणापासून साकारली आकर्षक गणेशमूर्ती

भुसावळात सोनार भगिनींची पर्यावरणपूरक किमया;
गाईच्या शेणापासून साकारली आकर्षक गणेशमूर्ती

भुसावळ:   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       येथील गंगाराम प्लॉट मधील भवानी पेठ मध्ये राहणाऱ्या खिलेश्वरी सोनार,प्रांजल सोनार आणि रोमा सोनार या तीन सख्ख्या बहिणींनी यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळा वेगळा आणि पर्यावरणपूरक संदेश दिला आहे. या तिन्ही भगिनींनी एकत्र येत गाईच्या शुद्ध शेणापासून अत्यंत आकर्षक अशी गणेशमूर्ती साकारली आहे. सध्या या मूर्तीची आणि तिच्या सभोवतालच्या देखाव्याची शहरात जोरदार चर्चा सुरू असून, हा अनोखा आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

स्वर्गातून बाप्पाचे आगमन
या बहिणींनी केवळ मूर्तीच नाही, तर त्याभोवती अतिशय सुंदर देखावा (आरास) देखील तयार केला आहे. जणू काही साक्षात स्वर्गातून गणेशजी पृथ्वीवर प्रकट होत आहेत, असा विहंगम देखावा त्यांनी उभा केला आहे. हा देखावा जिवंत वाटावा यासाठी कापसाचा वापर करून हुबेहूब पांढरे भरे ढग तयार करण्यात आले आहेत.

टाकाऊतून टिकाऊ आणि पर्यावरणपूरक साहित्य
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या बहिणींनी संपूर्ण सजावटीत प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळला आहे. गणपती बाप्पाच्या हातातील नाजूक कमळाचे फूल त्यांनी मातीपासून बनवले आहे. तर बाप्पाचे वाहन असलेला उंदीर आणि भव्य रथ तयार करण्यासाठी टाकाऊ कागदाचा (पेपर पल्प) वापर केला आहे.
सोनार भगिनींच्या या कलेचे आणि पर्यावरणपूरक कल्पकतेचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. हा विलोभनीय देखावा डोळ्यांत साठवण्यासाठी भुसावळकर मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या