Saturday, September 26, 2026
Homeजळगावकु.अनन्या सराफ हिने उजळविले यावलकर-सराफ परिवाराचे नाव.राष्ट्रपतीच्या हस्ते दोन सुवर्णपदकांनी सन्मान.

कु.अनन्या सराफ हिने उजळविले यावलकर-सराफ परिवाराचे नाव.राष्ट्रपतीच्या हस्ते दोन सुवर्णपदकांनी सन्मान.

कु.अनन्या सराफ हिने उजळविले यावलकर-सराफ परिवाराचे नाव.राष्ट्रपतीच्या हस्ते दोन सुवर्णपदकांनी सन्मान.

यावल,    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि. २६   कठोर परिश्रम, गुणवत्तेची अखंड साधना आणि कुटुंबीयांचे संस्कार व गुरुजनांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर यावलकर-सराफ परिवारातील कु. अनन्या गिरीश सराफ हिने शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करून संपूर्ण परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे. बडोदा येथील प्रतिष्ठित महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पदव्युत्तर औषधनिर्माण तंत्रज्ञान अभ्यासक्रमात अव्वल स्थान पटकावत अनन्याने तब्बल दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.

विद्यापीठाच्या ७५ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कु.अनन्या सराफ हिला ही दोन्ही सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला हा सन्मान तिच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अत्यंत गौरवाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे.

अभ्यासातील सातत्याने मिळविले अव्वल स्थान –
कु.अनन्या गिरीश सराफ हिने आपल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या काळात अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली.स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात अव्वल स्थान मिळवत दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरणे ही तिच्या जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्तेची साक्ष मानली जात आहे.
या यशामागे अनन्याचे अथक परिश्रम तर आहेतच; मात्र त्यासोबतच आई-वडिलांचे प्रोत्साहन, कुटुंबीयांचे संस्कार, भक्कम पाठबळ आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा असल्याचे तिच्या परिवाराकडून सांगण्यात आले.
यावलकर आणि सराफ परिवारासाठी गौरवाचा क्षण
कु.अनन्या ही वरणगाव, ता. भुसावळ येथील सौ. स्मिता व गिरीश कमलाकर सराफ ( हल्ली मुक्काम बडोदा ) यांची कन्या आहे. तसेच ती कै. कमलाकर सराफ (वरणगाव) व कै. डॉ. सतीश यावलकर (यावल) यांची नात असून पत्रकार तेजस सतीश यावलकर यांची भाची आहे.
त्यामुळे अनन्याने संपादन केलेले हे यश केवळ तिच्या वैयक्तिक शैक्षणिक कारकिर्दीतील उपलब्धी न राहता सराफ तसेच यावलकर परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन सुवर्णपदकांनी झालेला सन्मान हा अनन्याच्या शैक्षणिक प्रवासातील सुवर्णअध्याय ठरला असून,तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आई-वडील, धाकटी बहीण कु.आर्या यांच्यासह सराफ व यावलकर परिवारावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“मेहनतीला गुणवत्तेची जोड आणि संस्कारांना ध्येयाची दिशा मिळाली,तर यशाची शिखरे गाठता येतात,” याची प्रेरणादायी प्रचिती कु.अनन्या सराफ हिच्या या यशातून आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या