झांबरे सरांच्या घराजवळ अन् ग्लोबल हायस्कूलसमोर उघडे खड्डे; अपघाताची भीती, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर नागरिक संतप्त.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२६ यावल नगरपरिषद हद्दीतील व्यासनगरच्या कोपऱ्यावर, झांबरे सरांच्या घराजवळ गेल्या ८ दिवसांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्हचे (Valve) काम सुरू आहे.मात्र काम अर्धवट किंवा संथ गतीने चालू असल्याने त्या ठिकाणी मोठा खड्डा उघडाच पडून आहे.रात्रीच्या वेळी अंधारामुळे या खड्ड्यात वाहन पडून अथवा एखादा पादचारी पडून गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभाग प्रमुखांच्या या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराबाबत परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे,ग्लोबल हायस्कूलच्या समोरही असाच मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. समोरच शाळा असल्याने दररोज लहान-सहान विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. अशा व्यस्त ठिकाणी उघडा खड्डा असल्याने एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा जीव धोक्यात येऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.


मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी
जर पाईपलाईन किंवा व्हॉल्व्हचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असेल, तर ते खड्डे तात्काळ बुजवून रस्ता पूर्ववत करणे आवश्यक होते.परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत उघडेच ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळे यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तत्काळ स्वतः लक्ष केंद्रित करावे.पाणीपुरवठा विभाग प्रमुखांच्या निष्क्रिय कामकाजाची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि व्यासनगर कोपरा व ग्लोबल हायस्कूलसमोरील धोकेदायक खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा,अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

