भुसावळ येथे मित्रानेच केला मित्राचा खून
जुन्या नगरपालिकेजवळील घटना

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री उशिरा भुसावळ शहरात एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. राहुल सदाशिव धांडे (वय ३५, रा. कवठा, ता. अकोट, जि. अकोला) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पवन अनिल सोनवणे ,वय ३०, रा. वरणगाव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल धांडे आणि संशयित आरोपी पवन सोनवणे हे दोघे मित्र होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळपासून दोघेही सोबत होते. रात्री दोघेही जुन्या नगरपालिकेतील विहिरीसमोरील एका खोलीत बसले असताना राहुलने पवनला अश्लील शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पवनने राहुलला जमिनीवर जोरात आपटले. त्यानंतर रुमालाने त्याचा गळा आवळल्याने राहुलचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पवन तेथून पसार झाला.
दरम्यान, मित्राच्या मृत्यूनंतर अस्वस्थ झालेला पवन रात्रीच वरणगाव येथे पोहोचला. पोलिसांकडून अटकेची भीती असल्याने त्याने स्वतःहून वरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी त्याने राहुलचा गळा आवळून तसेच जमिनीवर आपटून खून केल्याची माहिती पोलिसांना दिल्याने.वरणगाव पोलिसांनी शुक्रवारी सकाळी या घटनेची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत असून, खुनामागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जात आहे.

