‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत दुसखेडा येथे विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना दाखले व योजनांचा लाभ वितरित.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२७
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या विशेष उपक्रमांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालय यावल यांच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

यावल तालुक्यातील दुसखेडा येथील पाड्यावर दि.२७ सप्टेंबर रोजी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
या विशेष मोहिमेदरम्यान व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला,अधिवास (डोमासाइल) प्रमाणपत्र यांसह विविध अत्यावश्यक शासकीय दाखल्यांचे जागेवरच वितरण करण्यात आले.तसेच पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्ड आणि ‘संजय गांधी निराधार योजने’चे मंजुरी पत्र वितरित करण्यात आले.
या उपक्रमाला यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार पवार, बामनोद क्षेत्राचे मंडळ अधिकारी आणि दुसखेडाचे ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी व अशासकीय सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.नागरिकांना शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सहजा – सहजी उपलब्ध व्हावा,हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

